पर्यावरण संवर्धन एक सामाजिक जबाबदारी म्हणजे काय?www.marathihelp.com

पर्यावरण संरक्षण ही सामाजिक जबाबदारी असून समाजातील प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणासाठी काम करणे ही आपली सामाजिक बांधीलकी आहे.

पर्यावरण आणि मानव यांचा संबंध मानवाच्या अस्तित्वापासूनच आहे. पृथ्वीवर मानवाचे पाऊल तिच्या निर्मितीच्या कालावधीनंतर पडले. मानवाने पृथ्वीवर वावरत असताना आपली बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती या आधारावर इतर सजीवांपेक्षा आपले स्थान महत्त्वपूर्ण ठरविले. आपल्या गुणांच्या आधारावर त्याने निसर्गावर थापन केले. निसर्गाने मानवाला जी वेगवेगळ्या प्रकारची साधनसंपत्ती दिली, त्या साधनसंपत्तीचा त्याने पुरेपूर करून घेतला. सुखी-समृद्ध जीवन जगण्याच्या प्रयत्नात तो निसर्गाकडून जेवढे घेता येईल तेवढे घेतच राहिला आणि वापर या प्रक्रियेत नैसर्गिक पर्यावरणाची हानी होण्यास सुरुवात झाली. यातूनच पर्यावरणीय समस्या वाढत गेल्या. यावरून एक मोर आपल्या लक्षात येते ती म्हणजे आज पर्यावरण समतोलामध्ये मानवाची भूमिका महत्त्वाची आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याचे काम जर मानवाने केले असेल तर त्याचे रक्षण, संवर्धन करण्याचे कामही तोच करू शकतो. बऱ्याचदा आपण करीत असलेली कृती ही पर्यावरणासाठी घातक आहे ही गोष्टच सर्वसामान्य लोकांना माहीत नसते व अजाणतेपणे काही कृती घडत राहतात.

पर्यावरणाचे संतुलन हे मानवाला आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. त्यादृष्टीने पर्यावरणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणूनच पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धनाच्या जाणीव-जागृतीसाठी संयुक्त राष्ट्र संघाने सन १९७२ ला पर्यावरण दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर दोन वर्षांनी ५ जून १९७४ ला पहिला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. जगातील १०० पेक्षा अधिक देश यात सहभागी आहेत. आताच्या काळात पर्यावरणाची हानी ही जागतिक समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी बनली आहे.

पर्यावरणातील विविध जैविक व अजैविक घटक हे मानवासाठी निसर्गाची अनमोल देणगी आहे. मानवाचा भूतकाळ पाहता असे लक्षात येते की, जेव्हा मानवाचे जीवन निसर्गाच्या सानिध्यात होते, तेव्हा मानवाला आरोग्यदायी वातावरण लाभत होते व पर्यावरण विषयक समस्या नव्हत्या. परंतु आता प्रगतीच्या नावावर आधुनिकीकरण व शहरीकरणामुळे माणूस निसर्गाच्या सानिध्यापासून दूर झाला. विविध क्षेत्रातील प्रगती करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून मानवाने पर्यावरणाला घातक अनेक समस्या निर्माण केल्या आहेत. शेतीतून भरघोस उत्पन्न घेण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करून मृदेची नैसर्गिक कार्यक्षमता कमी झाली, प्लास्टिकच्या अतोनात वापरामुळे मृदा प्रदूषण घडून आले. कारखान्यातील दुषित पाणी, सांडपाणी स्वच्छ पाण्यांच्या विविध स्त्रोतात मिसळल्याने पाण्याचेही जलप्रदूषण झाले. त्यामुळे पाण्यातील अनेक सजीव मृत्युमुखी पडले, पर्यावरणाची हानी झाली. आता तर चक्क गंगेत मृत शरीरेच विसर्जित केल्याचे दिसून येते. हेही किती विदारक आणि पर्यावरणाला घातक आहे. कारखाने, वाहनांमधून निघणाऱ्या विषारी वायूमुळे होणारे वायू प्रदूषण हेही पर्यावरणासाठी मोठ्या प्रमाणात घातक आहे. या विषारी वायुंपैकी हवेत मिसळलेले सल्फर डाय ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, इत्यादी वायूमुळे आम्लवर्षा होते. त्याचप्रमाणे वायुप्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता घटल्याने श्‍वसनाचे विकार, छातीत दुखणे, घसा दाह, हृदयविकार असे अनेक गंभीर आजार उद्भवतात. शीतगृहातून निघणारे क्लोरोफ्ल्युरो कार्बन हा वायू सूर्याच्या अतिनील किरणांपासून मानवाचे रक्षण करणाऱ्या ओझोन थराचे क्षतीकरण करत आहे. त्याचप्रमाणे तापमान वाढ झाल्याने हिमनग वितळत आहे. सागरजल पातळीत वाढ होऊन किनारी प्रदेशातील लोकांना आणि तेथील परिसंस्थांना धोका निर्माण झाला आहे. या समस्यांमुळे मानवी आरोग्यावर मोठा परिणाम व्हायला लागला आहे. एवढेच नव्हे तर, मानवाने औद्योगीकरण, रस्ते रुंदीकरण, सौंदर्यीकरण, विविध प्रकल्प, शहरीकरणासाठी अमाप वृक्षतोड केल्याने निसर्गाचा समतोल ढासळलेला पाहायला मिळतो. परंतु वृक्षतोड करतांना वृक्ष हे निसर्गाने मानवाला या धरतीवर दिलेले वरदान आहे. हे मात्र मानव विसरला. खरे तर वृक्षांशिवाय धरतीची कल्पनाही करता येणार नाही. वृक्षांमुळे पृथ्वीचे अस्तित्व टिकून आहे. म्हणूनच मला सर्वांना सांगावेसे वाटते की, "वाचतील झाडे, तरच जगतील माणसे." कारण एक झाड म्हटले की, त्यावर मानव, पशु-पक्षी, कीटक यांचा निर्वाह होतो, त्यांना निवारा मिळतो. त्यातूनच पर्यावरणाचे जीवनचक्र संतुलित राहते. म्हणून मुंगीपासून ते हत्तीपर्यंत प्रत्येक पशुपक्ष्यांचे, गवतापासून ते मोठ्या वृक्षांपर्यंत सर्व वनस्पतींचे व जलवनस्पतींचे, जलचर-भूचर सर्व प्राणिमात्रांचे पर्यावरण संतुलनात फार मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांचे संरक्षण व संवर्धन होणे फार गरजेचे आहे. यातील एकाही घटकाला हानी झाली तर संपूर्ण जीवनचक्रच कोलमडते व अनेक समस्या व संकटे उभी राहतात. म्हणून या घटकांचे अस्तित्व टिकवून ठेवणे आणि संवर्धन करणे आपले आद्य कर्तव्य आहे. त्याशिवाय पृथ्वीवर मानवी जीवनास पोषक वातावरण राहणार नाही. मात्र यासाठी पर्यावरण संवर्धनात प्रत्येकाची जबाबदारी फार महत्त्वाची आहे. कारण पर्यावरणाचा समतोल टिकून ठेवणे हे एका व्यक्तीचे किंवा गटाचे काम नाही. आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातील पर्यावरणाची जबाबदारी त्या व्यक्तीने पार पाडली, तरच पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन होईल. नाहीतर एकीकडे वृक्षारोपण करायचे आणि दुसरीकडे अमाप वृक्षतोड करायची. हा पर्यावरणाचा संहारच ठरेल. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून "पर्यावरण वाचवूया" या मोहिमेत स्वतःपुरते तरी योगदान दिले पाहिजे. मी एकट्याने नाही केले तर काय फरक पडणार ? ही नकारात्मक भूमिका मानवाला विध्वंसाकडे घेऊन जाऊ शकते. म्हणून पर्यावरण संवर्धनात प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून कार्य केले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या हातात असलेल्या कार्यापासूनच सुरुवात केली पाहिजे. हे करण्यासाठी पुन्हा-पुन्हा वापर करता येणाऱ्या वस्तूंची पुनर्निर्मिती केली पाहिजे, जिथे मानवी शक्तीने सहज काम होईल तिथे इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर टाळण्याचा प्रयत्न करावा, प्लास्टिक पिशव्यांऐवजी कागदी, कापडी पिशव्यांचा वापर करावा, पाण्याचा गैरवापर थांबवुन काळजीपूर्वक वापर करावा व इतरांनाही सांगावे, सौर ऊर्जेच्या वापरावर भर द्यावा, वृक्षारोपण करून त्यांची त्यांची काळजी घेतली पाहिजे, सर्व प्रकारच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात वाटा उचलला पाहिजे. या जबाबदाऱ्या काळजीपूर्वक व जाणीवपूर्वक पार पाडून प्रत्येकाने पर्यावरण रक्षणाला हातभार लावला पाहिजे.

आपला देश विज्ञान, तंत्रज्ञान अशा क्षेत्रात प्रगतीपथावर असून विकसित होण्याच्या उंबरठ्यावर असतांना आपण पर्यावरणाच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण प्रगतीच्या नावावर आतापर्यंत पर्यावरणाची हानी झाल्याने अनेक नैसर्गिक संकटे मानवावर ओढवली आहे. त्यामुळे आता स्वतःची पर्यावरणाविषयी जबाबदारी ओळखून व निसर्गाने दिलेल्या चेतावणीला वेळीच समजून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करुया. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करून निसर्गाच्या सानिध्यात आनंदी व निरोगी जीवन जगूया.

solved 5
पर्यावरण Saturday 15th Oct 2022 : 09:21 ( 1 year ago) 5 Answer 1033 +22